अहेरी:गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत जिमलगटा आणि रेपणपल्ली परिसरात नोंदवलेल्या एकूण ५१ गुन्ह्यांमधील ३५ लाख रुपयांच्या देशी दारू, विदेशी दारू आणि बियरचा प्रचंड मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय अहेरी आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गडचिरोली यांच्या परवानगीने पार पडली. शासकीय पंचांसह राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रीला मोठा धक्का बसला आहे.
मुद्देमाल नष्ट करण्यासाठी प्रथम तो जमिनीवर ठेवण्यात आला, त्यानंतर रोलर फिरवून पूर्ण चुरा करण्यात आला. नंतर जेसीबी मशीनने खोल खड्डा खोदला गेला आणि चुरा त्या खड्ड्यात टाकण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली होती.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा राहुल मडावी यांच्या उपस्थितीत पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे (प्रभारी अधिकारी, उप पोलीस स्टेशन रेपणपली) आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद गिरी (उप पोलीस स्टेशन जिमलगटा) यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. शासकीय पंचांसह राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे प्र.निरीक्षक शुभम चौधरी आणि दुय्यम निरीक्षक चंदन भगत यांच्या साक्षीने ही कारवाई झाली.













