अहेरी: जिल्ह्यातील विकासकामांना गती द्यावी आणि सर्वसामान्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवारी अहेरी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले आहेत.
या बैठकीत आमदार डॉ. आत्राम यांनी कृषी, सिंचन, घरकुल, शिक्षण, रस्ते, वीज आणि आरोग्य यांसारख्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. विशेषतः गोरगरिबांच्या घरकुल योजनेत कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. घरकुलाचे काम वेळेत पूर्ण करून गरिबांचे हक्काचे घर त्यांना मिळवून द्यावे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
अहेरीतील बहुचर्चित मुख्य रस्ता रुंदीकरणाचा प्रश्नही या बैठकीत अजेंड्यावर होता. रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेले सीमांकन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजने’अंतर्गत पांदण रस्ते त्वरित बांधण्याचे निर्देशही आमदार डॉ. आत्राम यांनी दिले. शेतीसाठी पांदण रस्ते उपलब्ध असल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल आणि मालाची वाहतूक सुलभ होईल, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांनाही या कामात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी (महसूल) अमर राऊत, तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.













