चिमूर – शेषराव राऊत
चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथील अतिक्रमण धारकांना घरपट्टे वितरण प्रक्रियेमध्ये नागरिकांकडून विविध प्रकारची कागदपत्रे सादर करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागत असून, त्यांना वेळ, श्रम व आर्थिक खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.
विशेषतः गरीब व गरजू कुटुंबांसाठी ही प्रक्रिया अधिक जाचक ठरत असून, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शंकरपूर येथे बऱ्याच वर्षापासून अतिक्रमणित बरेच घरे असून त्यावर ग्रामपंचायतीने रीतसर घर टॅक्स लावलेला आहे. व त्या संबंधात
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संबंधित नागरिकांची संपूर्ण नोंद, कर विवरण, घरकुलाची माहिती व इतर आवश्यक तपशील अधिकृत स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुन्हा त्याच माहितीची कागदपत्रे मागविणे हे अनावश्यक ठरत असून, गरिबांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या प्रक्रियेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत शंकरपूरचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे की, ग्रामपंचायतच्या अधिकृत नोंदींचा आधार घेऊनच घरपट्टे वितरणाची प्रक्रिया राबविण्यात यावी. यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व जलद होईल, तसेच नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. तसेच, अनावश्यक कागदपत्रांची मागणी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता असून, शासनाच्या सेवा अधिक लोकाभिमुख व परिणामकारक करण्यासाठी संबंधित विभागाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी केली आहे.













