भामरागड :
भामरागड तालुक्यातील पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या मानाच्या पुरस्कारासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक शंभूराजे पाटील, महिला पोलीस अंमलदार गणश्री ईटकलवार तसेच सध्या गुप्तवार्ता विभागात कार्यरत सहाय्यक आयुक्त संदीप भांड यांची निवड करण्यात आली आहे.
सदर पदक प्रदान करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन, गोपनीय अहवाल, तसेच वर्षभरातील रिवार्ड्स यांचा सखोल विचार करण्यात आला. त्यांच्या कार्यातील सातत्य, तत्परता आणि जबाबदारीची जाणीव लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.या गौरवामुळे भामरागड तालुक्यातील सर्व स्तरातून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल अहोरात्र परिश्रम घेत असते. अशा वेळी मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची दखल घेणारा आणि प्रेरणादायी ठरत आहे.













