मुलचेरा : ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन’ (NMNF) अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने २७ एप्रिल २०२६ रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या विभागस्तरीय कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली गावचे युवा शेतकरी संदीप मट्टामी यांचा नैसर्गिक शेतीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आला. दुर्गम भागातील या भूपुत्राने रासायनिक खत आणि कीटकनाशकांना तिलांजली देऊन नैसर्गिक पद्धतीने यशस्वी पीक घेत परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.
या सत्कार सोहळ्यात संदीप मट्टामी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील आणि बिटीएम आकाश लवटे यांचे मार्गदर्शन स्मरण करून आभार मानले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि आरोग्यासाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.कार्यशाळेत विविध जिल्ह्यांतून आलेल्या अधिकाऱ्यां, कर्मचाऱ्यां, शेतकरी प्रेरकांना नैसर्गिक शेतीचे तंत्र आणि अंमलबजावणीचे मार्गदर्शन झाले.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. धनराज उंदिरवाडे (संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला), पद्मश्री सुभाष शर्मा, उमेश घाडगे (विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर) उपस्थित होते.













