अहेरी: अपूर्ण बांधकाम, खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे वैगुण्य झेलणाऱ्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील सन्ड्रा फाट्यावर (आलापल्ली-सिरोंचा, ३५३-सी) बुधवारी दणक्यात चक्का जाम आंदोलन छेडले. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाने तब्बल दीड तास दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प केली. घोषणाबाजी आणि नार्यांचा कडकडाट करत प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.

आंदोलकांनी रस्त्याची दुरवस्था, सुविधांचा तुटवडा आणि स्थानिक समस्याांकडे दुर्लक्ष यावर तीव्र संताप व्यक्त केला. या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व संतोष ताटीकोंडावार यांनी केले.तर मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास भविष्यात आणखी भयंकर आंदोलन होईल असा इशारा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी दिला.

घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्यांवर तातडीने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार एन. सी. दाते, राष्ट्रीय महामार्ग अभियंता आशिष घोनमोडे, कंत्राटदार प्रतिनिधी, पीडब्ल्यूडी कन्सल्टन्सी अधिकारी रामजी यादव आणि अहेरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त उपस्थित होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तणावपूर्ण वातावरण नियंत्रणात राहिले.













