वरोरा : शहरातील मुख्य मार्गावर पथदिव्याचा खांब धोकादायकरीत्या झुकलेला असून तो शासकीय निवासस्थानांच्या अगदी मधोमध उभा आहे. एका बाजूला उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, तर दुसऱ्या बाजूला पंचायत समितीच्या शासकीय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. याच परिसरात न्यायाधीश महोदयांचेही निवासस्थान असल्याने या गंभीर बाबीकडे अधिक लक्ष वेधले जात आहे.
दररोज या मार्गावरून नागरिकांची व शासकीय कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत हा झुकलेला पथदिवा केव्हाही कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पादचारी व दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे.
स्थानिकांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून हा पथदिवा अशाच अवस्थेत असून संबंधित विभागाने अद्याप दखल घेतलेली नाही. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्थाही बाधित होत असल्याने परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण होते.
शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या अगदी मध्यभागीच अशी धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित नगरपरिषद अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून पथदिवा दुरुस्त करावा किंवा नवीन बसवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













