चिमूर प्रतिनिधी – शेषराव राऊत
चिमूर तालुक्यातील साठगाव येथे शेतकरी सुरेंद्र गुलाब बोबडे यांची गरोदर असलेली जर्सी गाय वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना सोमवारी (९ मार्च) घडली. गावालगतच्या शेतात बांधून ठेवलेल्या या गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला केल्याने ती जागीच ठार झाली. या गायीची अंदाजे किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याने शेतकरी सुरेंद्र बोबडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शंकरपूर परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
सुमारे चार महिन्यांपूर्वीही या परिसरात वाघाने दहा ते बारा शेतकऱ्यांची पाळीव जनावरे ठार केली होती. त्याचबरोबर परिसरात चार नरबळीही घेतले गेले होते. या घटनांमुळे संतप्त शेतकऱ्यांनी अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन करून वनविभागाकडे ठोस कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने दोन वाघ जेरबंद केल्यामुळे काही काळ परिसरातील दहशत कमी झाली होती आणि शेतकरी काही प्रमाणात निर्धास्त झाले होते.
मात्र आता पुन्हा एकदा वाघाने गावालगतच्या शेतात सुरेंद्र बोबडे यांची गाय ठार केल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले आहेत.
सध्या परिसरात हरभरा कापणी, कापूस वेचणी, गहू कापणी तसेच इतर पिकांची कापणी सुरू आहे. अशा परिस्थितीत वाघाची पुन्हा वाढलेली दहशत शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकरी सुरेंद्र बोबडे यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.













