गडचिरोली: जिल्हा हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील असून, दुर्गम-अतिदुर्गम भागांमध्ये माओवाद्यांनी जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी स्मारके उभारली होती. गेल्या काळातील प्रभावी माओवादीविरोधी अभियानांमुळे माओवादी चळवळ जवळजवळ संपुष्टात आली असून, सामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी रोजी सी-६०, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिस दलाच्या १८ पथकातील सुमारे ८०० जवानांनी जिल्हाभरातील एकूण ४४ माओवादी स्मारके एकाच दिवशी नष्ट केली.
यात एटापल्ली उपविभातील १८,हेडरी उपविभाग १७,भामरागड उपविभाग ०५,जिमलगट्टा उपविभाग ०२,धानोरा उपविभाग०१,पेंढरी उपविभाग ०१ स्मारक असे माओवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पेंगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा (जां.) यासारख्या गावांतील ही स्मारके होती. ही भौतिक स्मारके नव्हे तर माओवाद्यांच्या दहशतीची निशानी होती. पोलिसांनी ती उध्वस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोेजे आणि सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले. १६ बीडीनिआर पथके, विशेष अभियान पथक, सीआरपीएफ आणि पोस्ट/उपपोस्टांतील जवानांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली.
—————————-
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. नागरिकांसाठी सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल सतत प्रयत्नशील आहे. कोणीही माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.”
-नीलोत्पल पोलीस अधीक्षक, गडचिरोली













