सिरोंचा :सिकलसेल हा अनुवांशिक रक्तदोष असला, तरी योग्य वेळी तपासणी, समुपदेशन आणि जनजागृतीद्वारे हा आजार भावी पिढीत जाण्यापासून रोखता येतो. याच उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया’ हे व्यापक व लक्ष केंद्रीत विशेष अभियान राबविण्यात येत आहे. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ० ते ४० वयोगटातील नागरिकांची मोफत तपासणी, उपचार व जनजागृती केली जात आहे.त्या अनुषंगाने सिरोंचा तालुक्यात टेकडा ताला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या उपकेंद्र बोरमपल्ली येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व्यापक जनजागृती करण्यात आली.
सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताला हे अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत बोरमपल्ली, जाफराबाद, बेजुरपल्ली, बामणी, सिरकोंडा, वेनलाया, ग्लासफोर्डपेठा, रोमपल्ली आणि टेकडाताला असे एकूण नऊ उपकेंद्रांचा समावेश असून या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून जनजागृती, मोफत तपासणी व उपचार केले जात आहे. २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिनाचे औचित्य साधून बोरमपल्ली येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. महेश चव्हान यांच्या मार्गदर्शनाखाली गावात रॅली काढत जनजागृती तसेच विद्यार्थ्यांकडून सिकलसेलवर आधारित नाटकाद्वारे जनजागृती करण्यात आली.तसेच उपस्थित गावकऱ्यांना कुष्ठरोगाची शपथ देखील देण्यात आली. तसेच उपस्थित गावाकऱ्यांना सिकलसेल व कुष्ठरोग संदेश देऊन देण्यात आले. बोरमपल्ली उपकेंद्रात ० ते ४० पात्र वयोगटातील एकूण ६०० पैकी २७७ जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे.

२६ जानेवारी रोजी जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मादारमचे सरपंच दिवाकर कोरेत, मुख्याध्यापक अशोक आयितवार, सत्यम संगरती, शिक्षक आर पी घासले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीएचओ कु. अंशू चव्हाण, एएनएम कुमारी माधुरी पिल्ली,आरोग्य सेवक महेश पीपरे, सीएएनएम कु. माया मडावी, आशा वर्कर सारक्का अल्लुरी, अंगणवाडी सेविका सूर्यमाला कोटा, रजिता गट्टा यांनी परिश्रम घेतले.













