गोंडपिपरी( सुरज माडूरवार)
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ (आदर्श गाव) येथे 2021 ते 2025 या कालावधीत वितरित अतिवृष्टी व पीकहानी अनुदानात गंभीर अनियमितता झाल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. शासनाच्या आधार नोंदी, सातबारा उतारे व अनुदान वितरण प्रक्रियेचा गैरवापर करून बनावट शेतकरी तयार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तालुक्याबाहेरील तसेच शेती नसलेल्या व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारे तयार करून त्यांना पात्र शेतकरी म्हणून अनुदान देण्यात आले. वाढीव आराजी दाखवून या व्यक्तींना लाखोंचा आर्थिक लाभ मिळवून देण्यात आल्याने ग्रामस्थांत संताप उसळला आहे. प्रत्यक्षात या व्यक्तींचा गावाशी कोणताही संबंध नसल्याचे दस्तऐवजांवरून स्पष्ट होत आहे.
अनुदानाची रक्कम मिळाल्यानंतर ती लाभार्थ्यांकडून परत घेऊन एजंट आणि काही मंडळींमध्ये वाटप झाल्याचे प्राथमिक पुरावे समोर आले आहेत. हा प्रकार प्रशासनातील काही जबाबदार घटकांच्या संगनमताचा गंभीर इशारा देतो.
याउलट, प्रत्यक्ष पीकहानी झालेल्या कास्तकारांची आराजी मुद्दाम कमी दाखवून अत्यल्प अनुदान देण्यात आले. पीकहानी निकषांची पायमल्ली करून बोगस पात्रांना प्राधान्य दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी (दि. 27) बुधवारी पोंभुर्णा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
खोटे सातबारे, बनावट पात्रता, वाढीव आराजी आणि अनुदानाची परस्पर वाटणी या सर्वांमधून लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे पंचनामे व नोंदींवरून स्पष्ट होत आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी, संबंधितांवर गुन्हे नोंद आणि चुकीचे अनुदान वसूल करण्याची मागणी काँग्रेस नेते इंजि. वैभव पिंपळशेंडे,अंशुल मोरे, बाजार समिती संचालक विनोद थेरे व ग्रामस्थांनी केली.“घाटकुळसह संपूर्ण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील अनुदानाचे ऑडिट झाले, तर घोटाळा एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट होईल,असे पिंपळशेंडे म्हणाले.
पुढील काही दिवसांत या घोटाळ्यातील नवे खुलासे समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
अतिवृष्टी यादीत तालुक्यात बाहेरील शेतकऱ्यांचे बोगस नावे दाखवून लाखोंच्या अनुदान उचलणाऱ्या व्यक्तींकडून अनुदान वसूल करनार का..? ज्यांच्याकडे अतिवृष्टी सर्वेची जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.













