गडचिरोली: भूपती,सतीश सारख्या नक्षली नेत्यांचे आत्मसमर्पण आणि चकमकीत ठार झालेल्या हिडमा मुळे आता नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.मोठ्या प्रमाणात नक्षली आता आत्मसमर्पण करताना दिसत आहेत. मंगळवारी (25 नोव्हेंबर) रोजी गडचिरोली सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात 28 माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. यात 19 महिला माओवादींचा समावेश असून त्यांच्यावर एकूण 89 लाख रुपयांचे इनाम घोषित होते.
छत्तीसगड शासन, भारत सरकार, बस्तर पोलिस, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा दल यांनी मिळून सातत्यपूर्ण, समन्वयित आणि दृढ प्रयत्नांद्वारे हा उल्लेखनीय यश साध्य केले आहे. छत्तीसगड राज्यात सुरू असलेल्या पुना मारगेम उपक्रमामुळे परिसरात विश्वास, शांती आणि विकासाचा मार्ग आणखी मजबूत होत आहे.नव्या पुनर्वसन झालेल्या माओवादींमध्ये माड डिव्हिजन DVCM सदस्य, PLGA कंपनी क्रमांक 06 चे सदस्य, एरिया कमिटी सदस्य (ACM), तांत्रिक पथक, प्लाटून सदस्य आणि जनताना सरकारचे सदस्य यांचा समावेश आहे. सर्वांनी हिंसा सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
2025 या वर्षात आतापर्यंत एकूण 287 माओवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात परतले आहेत. यातील तीन माओवादी यांनी आपल्याकडे असलेली SLR, INSAS आणि .303 रायफल स्वेच्छेने जमा केली.हे विशेष.
हिंसक व जनविरोधी माओवादी विचारसरणीचा अंत आता जवळ आला आहे. लोक पूना मारगेम: पुनरवास से पुनर्जिवन’ या उपक्रमावर विश्वास दाखवत आहेत आणि शांती, सन्मान व स्थायी प्रगतीचा मार्ग निवडत आहेत.याप्रसंगी बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक पी.सुन्दरराज, जिल्हाधिकारी प्रतिष्ठा ममगई,पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुडिया, सीईओ आकांक्षा शिक्षाखलखो आदी उपस्थित होते.
————–
आज बस्तर परिक्षेत्रात मागील 50 दिवसांत 512 पेक्षा अधिक माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित माओवादी नेत्यांकडे आता शांततेचा मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.
-पी. सुंदरराज,पोलीस महानिरीक्षक बस्तर रेंज













