सिरोंचा:शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, सिरोंचा येथे मंगळवारी (२५ नोव्हेंबर ) रोजी उत्साहाच्या वातावरणात अहेरी प्रकल्पाचे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडेचे महत्त्व अधोरेखित करत या स्पर्धांचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांनी भूषविले. प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण पडशलवार यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून सीमा पडशलवार, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, आरोग्य विभागाचे डॉ. धाकड, तसेच सामाजिक कार्यकर्त्या वेंकटलक्ष्मी अरवली यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या प्रकल्प स्तरीय क्रीडा संमेलनात ११ शासकीय आणि १५ अनुदानित असे एकूण २६ शाळांचा समावेश आहे. एकूण २६ शाळांमधील ७१० विद्यार्थी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी झाले. क्रीडा स्पर्धेचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सूर्यभान डोंगरे यांनी केले.उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी खेळाडूंमध्ये क्रीडा भावना, शिस्त आणि टीमवर्क विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील सहभागातून आत्मविश्वास आणि एकात्मता वृद्धिंगत करावी, असे आवाहनही मान्यवरांकडून करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली, अहेरी आणि भामरागड या तीन एकात्मिक प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. अहेरी प्रकल्पातील केंद्रस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सिरोंचा येथील भव्य पटांगणात प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनास प्रारंभ झाला आहे. या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना विभागीय स्तरावर संधी दिली जाणार आहे.













