गडचिरोली: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील 16 उपक्रमशील शिक्षकांना “विनोबा पुरस्काराने” गौरविण्यात आले.
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणजेच ‘विनोबा (बा) अॅप’ या डिजिटल माध्यमातून शिक्षकांना आपले नाविन्यपूर्ण उपक्रम शेअर करण्याचे आणि कार्यांचे मूल्यमापन मिळविण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या अॅपच्या माध्यमातून शिक्षक साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कार्य अहवाल सहज पाहू शकतात. तसेच, जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा प्रत्येक महिन्यात सन्मान करण्याची परंपरा सुरू झाली आहे.
ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत “पोस्ट ऑफ द मंथ” म्हणून जिल्हास्तरीय विनोबा अॅप पुरस्कार संजय शंकर राठोड, हेमलता आखाडे, प्रदीप सिडाम, गुरुदेव किरणपुरे, प्रिती नवघडे, मिनाक्षी घोटेकर, रवींद्र यमसलवार, तलाश धाकडे व रणजित धनसदर यांना प्रदान करण्यात आले.तसेच, “मॉर्निंग असेंबली”, “स्पेलिंग बी”, “महावाचन कथा व चावडी वाचन”, “स्पोकन इंग्लिश” या उपक्रमांतही सात शिक्षकांना विशेष सन्मान देण्यात आले. लायब्ररी उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल लक्ष्मण रत्नम, विनित पद्मावार, व सीता टेकुलवार यांना लायब्ररी बॅग देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास विनोबा अॅप प्रोजेक्ट ऑफिसर गणेश शेंडे व चंदन रापर्तीवार उपस्थित होते. भविष्यातील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी व्यक्त केली.













