गडचिरोली : दारूबंदी असतानाही काही जणांनी दारू आणण्यासाठी एवढ्या भन्नाट शक्कली लढवल्या की पोलिसांनाही क्षणभर हसू की रागवू हा प्रश्न पडला. एका तरुणाने थेट दुचाकीच्या पेट्रोल टाकीत ‘गुप्त कप्पा’ बनवून रॉयल स्टॅगच्या बाटल्या लपवल्या, तर एका आजीबाईंनी थंडीमुळे शरीरावर घेतलेल्या जॅकेटमध्ये तब्बल 90 निपा ‘घुसवून’ आणण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी असली तरी “कल्पकतेची नशा” मात्र अजूनही कमी झालेली दिसत नाही.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली ठाण्याच्या सर्वेक्षण पथकांनी विविध ठिकाणी नाके उभारले आहेत. पारडी नाक्यावर तपासणीदरम्यान एमएच 34 ए एक्स 9809 क्रमांकाची दुचाकी थांबवण्यात आली. पेट्रोल टाकी उघडली तेव्हा तेलाऐवजी सुगंध होता व्हिस्कीचा! आत 180 मिलीच्या रॉयल स्टॅगच्या 40 सीलबंद बाटल्या आढळल्या. तानाजी नानाजी पेंदोरकर (वय 34, रा. हैदराबाद, हल्ली व्याहाड बु.) याला जागेवरच अटक करून दुचाकीसह माल जप्त करण्यात आला.
दरम्यान, चंद्रपूरवरून येणाऱ्या एसटी बसमध्ये पोलिसांना एक आजी स्टोल पांघरत शांतपणे बसलेली दिसली. संशय आल्यावर तपास घेतला तर तिच्या जॅकेटमध्ये देशी दारूच्या तब्बल 90 निपा आढळून आल्या. महिला ललिता सुधाकर महामंढरे (वय 65, रा. रामपुरी, ता. आरमोरी) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि. शिवाजी देशमुख आणि मपोउपनि. पूजा नैताम यांनी पार पाडली.













