गडचिरोली :जिल्ह्यातील दक्षिण भागात सर्वात महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या आलापल्ली ते आष्टी (३५३-सी) या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अज्ञात वाहनाच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दशरथ सिताराम आत्राम (वय ५५) रा.चुटूगुंटा (तालुका मुलचेरा) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेत निष्पाप आदिवासी बांधवाचा जीव गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे मागील तीन ते चार वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यातच या परिसरात जड वाहनांची वर्दळ असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशात ट्रॅफिक जाम होणे,एसटी बस आणि खाजगी वाहनधारकांना तासनतास वाट बघून आहे त्या परिस्थितीत प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच काय तर या परिसरात अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
२० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या घरातून बाहेर पडलेल्या दशरथ सिताराम आत्राम यांना रस्ता लेव्हलिंग करणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अक्षरशा चीरडले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दशरथ हा त्या वाहनाखाली खाली सापडल्याने जागीच ठार झाला आहे.सदर वाहनधारकाला अपघात झाल्याचे कळताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली.तर घरच्यांनी हंबरडा फोडला.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवन्यात आले आहे.विशेष म्हणजे दशरथ सीताराम आत्राम यांना पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे आत्राम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे तर चुटूगुंटा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.













