भामरागड:शासनाने दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड तालुक्यात विविध उपक्रमांनी सदर सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले आहे.
सेवा पंधरवड्याला १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या दिवशी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली येऊन नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देतील.१७ ते २२ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात पाणंद /शिवार रस्त्यांना क्रमांक देणे त्यांचे सर्वेक्षण करणे गाव नकाशावर चिन्हांकित करणे आणि त्यांची नोंद करणे यासारख्या कामावर भर दिला जात आहे.२३ ते २७ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घर बांधण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींचे पट्टे वाटप करणे तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे व योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले जाणार आहेत.२८ ते २ सप्टेंबर या तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत जसे लक्ष्मी मुक्ती योजना आपसी वाटणीची प्रकरणे आणि शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन सर्टिफिकेट वाटप करण्यात येणार आहेत.
यासोबतच सेवा पंधरवड्यात बचत गटांना कर्जवाटप, महा डीबीटी योजनेचे अर्ज स्विकारणे, माझी कन्या भाग्यश्री योजना,नवीन मतदार नोंदणी, ई-रेशन कार्ड, महसूल व अतिक्रमण विषयक कामकाज,शेती सुलभ योजना,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी शिबिर घेणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले आहे.













