मुलचेरा:येथील तहसील कार्यालय मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबरपासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ०२ ऑक्टोबरपर्यंत या कालावधीत सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत शासन लोकांपर्यंत पोहोचणार असून सर्वांनी या अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे.
यामधे मुख्य तीन टप्पे असून पहिल्या टप्प्यांमध्ये दिनांक १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीमध्ये पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात येणार आहे.त्यांतर्गत संपूर्ण ६९ गावांमध्ये शिवारफेरी करण्यात आलेली असून यामध्ये रस्त्यांची वर्गीकरण आणि रस्त्यांची माहिती याचा डाटा संकलित करण्यात येणार आहे. या अभियान कालावधीमध्ये लगाम महसूल मंडळामधून दामपुर आणि मुलचेरा महसूल मंडळामधून उदयनगर ही गावे निवडलेले आहेत. या गावामध्ये रस्त्यांची शिवारफेरी,रस्त्यांचे सीमांकन करण्यात येईल तसेच अतिक्रमण झालेले असल्यास ते निष्कासित करण्यात येईल.त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
दुसरा टप्पा २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीमध्ये असणार आहे. यामध्ये सन २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर घरांसाठी अतिक्रमण आहेत,असे प्रस्ताव तयार करून शक्ती प्रदत्त समितीमार्फत त्यांना स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
तिसरा टप्प्यामध्ये २८ ते ०२ ऑक्टोबरपर्यंत नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे नियोजीत केले आहे. यामध्ये लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत ज्या सातबारा वरती पुरुषांचं नाव आहे अशा ठिकाणी त्यानी संमती दिल्यानंतर त्यांच्या पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून लावण्याचा उपक्रम आहे.आतापर्यंत असे एकूण ५२ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. दुसरी महत्वाची योजना सामायिक क्षेत्रातील खातेदारांसाठी आहे. यामध्ये आपण आपसी समंतीने वाटप करून पोटहिस्सा पाडणे अंतर्भूत आहे. असे एकूण ४१ प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.तसेच तालुक्यातील आदिम जमातीसाठी वेंगणूर या ठिकाणी ३० सप्टेंबरला आणि भटक्या विमुक्त जातीची लोकसंख्या असलेले लाभानतांडा या गावी ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी शिबीर आयोजित केलेले आहे.
विध्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजनेअंतर्गत आपले सरकार केंद्र स्थापन करणार असून जेणेकरून विध्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले त्याच महाविद्यालयात दिले जातील. तहसील कार्यालय मुलचेरा QR कोड वाचनालय हा एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे,यामध्ये तब्बल कायद्याची ११ पुस्तके अतिशय सोप्या पद्धतीने आणि मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. अशा प्रकारे एकूण १५ दिवसांचा अतिशय सुनियोजित कार्यक्रम आपण सुनिश्चित केलेला आहे आणि त्यानुषंगाने आजपासून कार्यवाही सुरु होणार आहे.













