गडचिरोली: जिल्ह्यातील पल्ली जंगल परिसरात सुरक्षा दलांनी संयुक्त मोहीम राबवून चार जहाल माओवाद्यांना १९ एप्रिल रोजी अटक केले आहे. हे माओवादी गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून, त्यांनी पोलीस जवानांच्या हत्ये समेत अनेक हिंसक घटनांमध्ये सहभाग घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाने या चौघांच्या अटकेवर तब्बल ४० लाख रुपयांचे बक्षीसे जाहीर केले होते.गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईतून येथील नक्षलवाद्यांविरुद्ध चालू असलेल्या अभियानाला नवे बळ मिळाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, उपविभागीय भामरागड अंतर्गत पोस्टे ताडगाव परिसरात सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत परिक्षण कारवाई केली असता चार संशयित व्यक्ती आढळून आल्या. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस उप मुख्यालय प्राणहिता येथे आणले असता त्यांनी आपली ओळख पुढीलप्रमाणे दिली – सायलु भुमय्या मुड्डेला उर्फ रघु उर्फ प्रताप (डिव्हीसीएम, दक्षिण गडचिरोली डिव्हिजन) वय ५५ वर्ष, जैनी भिमा खराटम उर्फ अखीला उर्फ रामे (डिव्हीसीएम, भामरागड दलम/सचिव भामरागड एरिया कमिटी) वय ४१ वर्ष, झाशी दोघे तलांडी उर्फ गंगु (सदस्य भामरागड दलम) वय ३० वर्ष, आणि मनिला पिडो गावडे उर्फ सरिता (सदस्य भामरागड दलम) वय २१ वर्ष ही चारही माओवादी गटाच्या भामरागड दलमशी संबंधित असून, त्यांच्या अटकेपूर्वी त्यांनी पोलीस जवानांच्या हत्यांमध्ये आणि जंगलात घातपात करण्याच्या योजना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मौजा दिरंगी-फुलनार जंगलात झालेल्या चकमकीत एका पोलीस जवानाच्या ठार होण्यामागील जबाबदार देखील हेच आहेत.यासह त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या चार माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने अनुक्रमे २० लाख, १६ लाख, २ लाख आणि २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या कारवाईमुळे जानेवारी २०२२ पासून गडचिरोलीत ९६ माओवाद्यांना अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहीमेने जिल्ह्यातील माओवाद्यांविरोधातील लढ्याला वधार दिला आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कारवाईचा उल्लेख करत माओवाद्यांना हिंसाचार सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे.
जहाल माओवादी दाम्पत्याच्या अटकेमुळे चळवळीला हादरा
सायलू भूमय्या मुड्डेला हा तेलंगणा राज्यातील लिंगापूर येथील रहिवासी असून तो १९९० मध्ये माओवादी चळवळीत सामील झाला.त्यांनतर त्याने विविध दलम सदस्य ते डिव्हीसीएम पदापर्यंत मजल मारली.२०२४ पासून तो दक्षिण गडचिरोली विभागीय समितीच्या सचिव पदावर काम करत होता. त्याच्यावर एकूण ७७ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ३४ चकमक सात जाडगूळ २३ खून व १३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.तर त्याची पत्नी जैनी भीमा खराटम ही छत्तीसगड राज्यातील कंचाला येथील रहिवासी असून २००१ पासून ती माओवादी चळवळीत सामील झाली.तिने देखील दलम सदस्य ते डिव्हीसीएम पदापर्यंत मजल मारली.२०२१ पासून ती डिव्हीसीएम पदावर राहून भामरागड एरिया कमिटीची सचिव म्हणून आतापर्यंत काम केले. तिच्यावर एकूण २९ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १८ चकमक, ०३ जाळपोळ, ०४ खून व ०४ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.या माओवादी दाम्पत्याच्या अटकेमुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला हे विशेष.
दक्षिण भागात माओवाद्यांची संख्या घटली
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक माओवादी चकमकीत ठार झाले तर काहींनी हिंसक मार्ग सोडून सन्मानाने जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे.तर आज अटक झालेल्या माओवाद्यांमध्ये झाशी दोघे तलांडी भामरागड तालुक्यातील येचली येथील रहिवासी असून तिच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत.मनिला पिडो गावडे ही अहेरी तालुक्यातील कपेवंचा येथील रहिवासी असून तिच्यावर एकूण १० गुन्हे दाखल आहेत.या दोन माओवाद्यांच्या अटकेमुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सक्रिय माओवाद्यांची संख्या घटली आहे.













