गडचिरोली: जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात घडलेल्या धानाच्या अपहार प्रकरणात गडचिरोली पोलीसांनी चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर वय 39 वर्ष.हितेश व्ही. पेंदाम विपणन निरीक्षक तथा ग्रेडर, वय 35 वर्ष. यांना अटक केली आहे.
राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले जाते. महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत ही खरेदी केली जाते. खरेदी केलेल्या धानाचा पुढील व्यवहार कार्यालय स्तरावरून मिलर्सकडून केला जातो. परंतु, देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात ही प्रक्रिया शंभर टक्के अनुसरली नसल्याचे चौकशीतून उघडकीला आले. खरेदी हंगाम 2023-24 आणि 2024-25 हंगामात एकाहून अधिक क्विंटल धानाची तफावत उघड झाली. यातून एकूण 3 कोटी 96 लाख 65 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी त्यांची अटक केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे. सदर गुन्हा प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी हाती घेतला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण
आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत 2023- 24 व 2024- 25 मध्ये मिळून तब्बल दहा हजार क्विंटलची तफावत आढळली होती. बारदान्यामध्येही अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दोन्ही वर्षांत एकूण 3 कोटी 96 लाख रुपयांचा गैरव्यवहार समोर आलेला आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दोन्ही वर्षांतील गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदवून संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा व त्या मालमत्तेचा लिलाव करुन त्यातून गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आठ दिवस उलटूनही आदिवासी विकास महामंडळाने फिर्याद नोंदविली नव्हती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याचे निर्देशीत केले होते. त्यानंतर जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला हे विशेष.













