भद्रावती │ तालुक्यातील घोसरी फाटा ते खुटवंडा मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक त्रस्त असून प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. हा मार्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो.
सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे डांबरीकरण पूर्णतः उखडले असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गिट्टी अस्ताव्यस्त पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खुटवंडा येथील ताडोबा राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने पर्यटक, एसटी बस आणि इतर वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुचाकी, चारचाकी आणि सायकलस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असून, अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकही या समस्येमुळे हैराण झाले आहेत.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुधीर मुडेवार यांनी दिला आहे. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.













