भामरागड:केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत ‘वन नेशन,वन स्टुडंट आयडी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.संपूर्ण देशभरात नोंदणीचे काम केले जात आहे.पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमीक अकाउंट रजिस्ट्री आयडी’ (अपार कार्ड) दिला जाणार आहे.मात्र काही आदिवासी पालकांमध्ये अपार आयडी वरून गैरसमज आहेत. त्यामुळे या कामात व्यत्यय निर्माण होत आहे.अपार आयडी ही केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी असून यामध्ये कुठल्याही प्रकारे लसीकरण केले जाणार नाही किंव्हा विध्यार्थ्यांना शारीरिक इजा अथवा नुकसान पोहोचेल असे कुठलेही काम यात नसणार आहे.त्यामुळे अश्या अफवांवर विश्वास न ठेवता पालकांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे.
भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी बरेच पालकांनी विरोध केल्याने शिक्षकांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.एकीकडे शासनातर्फे लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे निर्देश आहे.तर दुसरीकडे पालकांनी नकार देत आपल्या पाल्यांना घरी घेऊन जात असल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.याबाबत संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी भामरागड प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र देऊन कळविले आहे.त्यांनतर स्वतः भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांनी पालकांना आवाहन केले आहे.
अपार आयडी बाबत पसरलेल्या अफवा हे भ्रामक व निराधार आहे. सदर उपक्रम हा केंद्रपूरस्कृत असून ‘एक देश,एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून संपूर्ण देशभर सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.सदर अपार आयडी हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी कायमस्वरूपी ओळख क्रमांक आहे.या ओळख क्रमांकामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे सर्वसमावेशक निरीक्षण केल्या जाईल त्याचप्रमाणे विध्यार्थी गळती प्रमाण कमी करणे,शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. परीक्षेचे निकाल,समय अहवाल, अभ्यासेत्तर प्रगतीचा एक प्रकारचा डीजीटल स्टोरेज असेल त्यामुळे विध्यार्थ्यांना विविध कारणाने शाळा बद्दलविताना अथवा स्थानांतरण करताना अगदी सोपे जाईल.
अपार आयडी विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व त्यांच्या शैक्षणिक भावीतव्याशी जुळलेले आहे.यात विद्यार्थ्यांचे किंव्हा पालकांचे कुठलेही नुकसान होणार नसल्याचे आश्वासन देतानाच त्यांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे विनंती केले.













