अहिल्यानगर :खेळाकडे फक्त स्पर्धा व मनोरंजन म्हणून पाहू नका, खेळातून यशस्वी नागरिक घडण्याची पायाभरणी होत असते. शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे केंद्र नसून, मुलांमध्ये सर्व गुणांचा पाया रुजवणारे मंदिर आहे. खेळात जय-पराजय हा अविभाज्य भाग आहे. इतिहास पराभवाची पण नोंद घेत असतो, पण त्यासाठी संघर्षात दम असावा लागतो, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांच्या संयुक्त खेळ मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, विश्वस्त मंडळाचे सदस्य ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, सुनीता मुथा, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, रुपीबाई बोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संदीप उबाळे, नवीन मराठी शाळा विश्रामबागच्या मुख्याध्यापिका वनिता गोत्राळ, किशोर संस्कृत प्रशाला मुख्याध्यापिका उज्वला कळमकर आदींसह सर्व शालेय शिक्षक, क्रीडा शिक्षक, खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.