मुंबई (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबदल आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
सतीश चव्हाण यांनी पक्षातून निलंबनाच्या आदेशानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या चर्चेने राजकीय वर्तुळात चव्हाण शरद पवार गटात सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण सध्या विधान परिषदेचे आमदार असून, ते गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी, सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, “महायुती सरकारने बहुजन समाजाला न्याय दिला नाही.” त्यांनी पत्र लिहून सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.
आ. संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, “सतीश चव्हाण यांनी अनेक कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंगापूर मतदारसंघात बोलावून विकासकामे केली. कामे करून घेतल्यानंतर सरकारवर टीका करणे योग्य नाही.” त्यांनी असा आरोप केला की, चव्हाण यांनी निवडणूक लढविण्यासाठी राजकीय हालचाल केली आहे.
निलंबनानंतर चव्हाण यांच्या राजकीय भविष्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते शरद पवार गटात सामील होतात की स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.