राहुरी, शहाजी दिघे –
आचारसंहिता लागू झाल्यानंतर संगमनेर हद्दीत होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. गुरुवारी गुजरात राज्यातील रहिवासी असलेल्या दोन व्यक्तींकडून 42 लाख 15 हजार रुपयांची रोकड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरातून जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
अटक करण्यात आलेल्यांची नावे मुकेशकुमार रमेशभाई पटेल (वय 36) आणि धवलकुमार जसवंतभाई पटेल (वय 32, सध्या रा. पार्श्वनाथ गल्ली, संगमनेर, मूळ रा. गुजरात) अशी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना रोख रक्कम लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संगमनेर शहरातील एका दुकानाच्या वरच्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात रोकड साठवून ठेवली असल्याचे समजले. त्यानंतर स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ छापा टाकून दोन आरोपींच्या ताब्यातून 42 लाख 15 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.
पोलिस तपासात आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, जप्त केलेली रक्कम भावेर रमाभाई पटेल (रा. पार्श्वनाथ गल्ली, संगमनेर) आणि आशिष सुभाष वर्मा (रा. अहिल्यानगर) यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अतुल लोटके, अमृत आढाव,आणि मनोज गोसावी यांच्या पथकाने केली.
सध्या पोलिसांकडून या रकमेचा अधिक तपास सुरू आहे. तसेच हवाल्याच्या व्यवहाराशी संबंधित इतर कोणताही गैरव्यवहार उघड होतो का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.