पालघर (ओमकार पोटे) :- जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच घरातील तिघांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये वयोवृद्ध दाम्पत्य आणि त्यांची मुलगी यांचा समावेश आहे.
मुकुंद बेचरदास राठोड (वय 75), कंचन मुकुंद राठोड (वय 65), आणि संगीता मुकुंद राठोड (वय 52) असे या मृतकांचे नाव आहे. हे कुटुंब मूळचे गुजरात येथील असून नेहरोली येथे वीस वर्षांपासून राहत होते. 18 ऑगस्टपासून या कुटुंबाचा काहीही संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा सुहास, जो राजकोट येथे फॅब्रिकेशन व्यवसाय करतो, तो त्यांना शोधण्यासाठी नेहरोली येथे आला होता.
घराला बाहेरून कुलूप असल्याने सुहासने आजूबाजूच्या दवाखान्यांत आपल्या कुटुंबाचा शोध घेतला, परंतु कुठेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर, घरातील काही कागदपत्रे काढण्यासाठी कुलूप फोडल्यावर, सुहासने आत बघितले असता त्याच्या आई आणि बहिणीचे मृतदेह एका बंद पेटीत तर वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला आढळला. मृतदेहांवर जाड गाद्या टाकण्यात आल्या होत्या, ज्यामुळे बाहेर वास येऊ नये असा प्रयत्न करण्यात आला होता.
वाडा पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत, आणि सुहास राठोड यांनी आपल्या कुटुंबाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.