वैजापूर:
समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज पहाटे पाच वाजता वैजापूर तालुक्यातील खंबाळा शिवारात खाजगी बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी ४ जण गंभीर आहेत.
संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस खंबाळा शिवारात कंटेनरला पाठीमागून धडकली. धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेने महामार्गावरील प्रवासी सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून, समृद्धी महामार्गावर अपघातांची वाढती संख्या गंभीर चर्चेचा विषय बनत आहे.