गडचिरोली: देशात विकासाचा गवगवा केला जात आहे. एकीकडे बुलेट ट्रेन धावत आहेत तर दुसरीकडे खेड्यापाड्यातील नागरिकांनी अजून पर्यंत एसटी महामंडळाची बस देखील बघितली नाही. अशातच स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या गर्देवाडा गावात पहिल्यांदाच पोलिसांच्या पुढाकाराने एसटी बस पोहोचली. रविवार पासून बस सेवा सुरू झाल्याने युवक,अबालवृद्धांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला.
गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्हयातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत नक्षलवाद्यांनी या ठिकाणी अस्तित्व निर्माण केला. त्यामुळे अजूनही गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात विकास होऊ शकला नाही. अशीच काहीशी परिस्थिती जांबिया-गट्टा पलीकडील परिसरात आहे. गडचिरोली पोलीस दलातर्फे नुकतेच काही महिन्यापूर्वी या भागातील वांगेतुरी आणि गर्देवाडा येथे पोलीस मदत केंद्र उभारले. त्यानंतर येथे विकासाचे सूर्योदय झाले.एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड समजला जाणाऱ्या या भागात अनेक विकासकामे सुरू आहेत.पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीपासुन तेथील परिसरातील नागरिकांना विविध सोई-सुविधा गडचिरोली पोलिसांनी उपलब्ध करुन दिले आहेत.
याचाच एक भाग म्हणुन रविवार (२२सप्टेंबर) रोजी गर्देवाडा ते अहेरी अशी प्रथमच एसटी महामंडळाची बस सेवा सुरु करण्यात आली आहे. पुर्वी जांबिया-गट्टा पर्यंतच एसटी बस धावायची.जांबिया गट्टा पलीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता व नदी नाल्यावर पूल नव्हता.गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या पाठपुराव्याने ताडगुडा येथील पुलाचे तसेच रस्त्याचे बांधकाम वेळेत पुर्ण झाल्याने आता या भागातील बारा गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवारी अहेरी आगाराची एसटी बस पाहिल्याचं गावात पोहोचली.तेंव्हा गावातील महिलांच्या हस्ते बसचे पुजन करुन बस सेवा सुरु करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र परिवहन विभागाचे चालक रामु कोलमेडवार व वाहक गणेश गोपतवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच बसचे वाहक गणेश गोपतवार यांनी गावातील नागरिकांना बसच्या प्रवासाचे टप्पे, बस तिकीटाचे दर इ. बाबत विस्तृत माहिती दिली. सदर बस सेवा सुरु झाल्यामुळे परिसरातील नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बस सेवेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)एम. रमेश यांनी विशेष प्रयत्न केले. तर हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूजन कार्यक्रम करण्यात आले.यावेळी सिआरपीएफचे असिस्टंट कमाण्डेट संतोष डरांगे,पो.नि.जितेंद्र,पोमकें गर्देवाडा येथील प्रभारी अधिकारी पोउपनि. धनाजी शिंदे, पोउपनि. संग्राम अहिरे, एसआरपीएफचे पोउपनि देवकुळे व पोलीस अंमलदार यांच्यासह मौजा गर्देवाडा येथील नागरिक उपस्थित होते.