अहेरी: विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने आरोग्य सेवा तुटपुंजी असल्याने नागरिकांना उपचाराकरिता तालुका मुख्यालयात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता द्यावी, अशी मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी केली होती.याची दखल घेत शासनाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आणि भामरागड तालुक्यातील ताडगाव असे दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे.
एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात बरेच दुर्गम व अतिदुर्गम गावांचा समावेश आहे.शिवाय लोकसंख्येच्या मानाने या दोन्ही तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या देखील कमी आहे. या भागातील आदिवासींना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी मागील अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी देखील नागरिकांनी केली होती. लोकसंख्येच्या मानाने पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.ही बाब मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी शासनाकडे रेटून धरली.अखेर नुकतेच एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आणि भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली आहे.
एटापल्ली तालुक्याची लोकसंख्या जवळपास ९० हजार एवढी असून सध्या जांबिया गट्टा,तोडसा,कसनसूर, कांदोडी बुर्गी आणि पीपली बुर्गी असे एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र होते. आता जारावंडी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाल्याने एटापली तालुक्यात आता एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र झाले आहेत.तर भामरागड तालुक्याची एकूण लोकसंख्या जवळपास ४० हजार असून याठिकाणी आरेवाडा,लाहेरी आणि मनेराजाराम असे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र होते.आता ताडगावला नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने भामरागड तालुक्यात आता चार प्राथमिक आरोग्य केंद्र झाले आहेत.
उपकेंद्र आणि आरोग्य पथक असलेल्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
————————————–
एटापल्ली आणि भामरागड तालुक्यात लोकसंख्येचा विचार करता पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे या भागात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू होते.२०२३ मध्ये पीपली बुर्गी आणि आता जारावंडी व ताडगाव असे दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. या माध्यमातून या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल अशी आशा आहे.
-डॉ.धर्मराव बाबा आत्राम,मंत्री अन्न व औषध प्रशासन