वरोरा : येथील खांजी वार्ड अंबादेवी मंदिरासमोर. दिनांक 3 सप्टेंबर रोजी मंगळवारी राजेंद्र बनसोड यांच्या सौजन्याने तान्ह्या पोळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लहान मुलांच्या उत्साही सहभागामुळे परिसर आनंदमय वातावरणाने भरून गेला. तान्ह्या पोळ्याच्या निमित्ताने अनेकांनी आपले नांदीबैल सजवून कार्यक्रमात भाग घेतला.
सदर कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगीत कांड्या, पेन्सिल व इतर शालेय साहित्य वाटप करून सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत मुलांना नियमित शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र बनसोड आणि त्यांचे सहकारी जयंत आडकिने, नौशाद शेख, संदीप अडकिने, अजय लेदे, आकाश मेश्राम, महेश विधाते, रोहन केराम, आणि आकाश देहारे यांनी विशेष प्रयत्न केले.
तान्ह्या पोळा हा पारंपारिक सण असला तरी यामधून समाजप्रबोधनाचा संदेश दिला गेला. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करून त्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.