गडचिरोली:स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतेही क्षेत्र, कठोर परिश्रम हीच यश याची गुरुकिल्ली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेस उपयुक्त विषय पदवीसाठी निवडावेत, चांगले छंद जोपासवेत व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगले मित्र असल्यास कोणत्याही कठीण प्रसंगाचा सामना करता येतो, असे प्रतिपादन घोट पोलीस पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी नितेश गोहणे यांनी केले.
पोलीस मदत केंद्र घोटच्या वतीने जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात घोट हद्दीतील महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.यावेळी जवाहर नवोदय विद्यालयचे उप प्राचार्य इंदूरकर सर जिल्हा परिषद हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेज घोटचे प्राचार्य कोव्हाळे सर,सामाजिक कार्यकर्ते,आसिफ शेख,तसेच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेले उमेदवार देखील मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना नितेश गोहणे यांनी शहरासारखे सोयी-सुविधा नसतानाही ग्रामीण भागातील तरुण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होताना दिसून येत आहे. खरंच गडचिरोलीसाठी ही अभिमानाची बाब आहे. या भागातील तरुणांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पाहिजे तश्या सुविधा नाहीत. ही बाब लक्षात येताच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी गाव तिथे वाचनालय हा अभिनव उपक्रम राबविला आहे.
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आज खेड्यापाड्यात देखील सुसज्ज असे वाचनालय तयार झाले आहे. घोटमध्ये देखील सुसज्ज वाचनालय असून याचा या भागातील तरुण-तरुणींना मोठा फायदा झाला. येथे अभ्यास करणारे 13 जणांची निवड पोलीस शिपाई म्हणून झाल्याचे त्यांनी सांगितले.
घोट परिसरातील तब्बल 36 तरुण,तरुणींची पोलीस शिपाई म्हणून निवड झाली असून त्यापैकी 28 तरुण यावेळी उपस्थित होते.सर्व उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते पोलीस मदत केंद्र घोट तर्फे शिल्ड, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत व पोलीस भरती संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. तसेच निवड झालेल्या उमेदवारांनी आपापले मनोगत व्यक्त केले. घोट पोलीस मदत केंद्राच्या या अभिनव उपक्रमामुळे पोलीस शिपाई म्हणून निवड झालेले तरुण तसेच त्यांचे आई-वडील भारावून गेले होते.