अहेरी:सवतंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही दुर्गम भागात मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने आदिवासी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशीच काही परिस्थिती एटापल्ली तालुक्यातील कसनसूर परिसरात असल्याने येथील पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने चक्क रस्ताच तयार केला.यामुळे या भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे.
एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस मदत केंद्रात जवळपास ३२ गावांचा समावेश आहे.त्यात बरेच अतिसंवेदनशील गावांचा समावेश आहे.कसनसूर ते कोटमी दरम्यान असलेला रस्ता पावसाळ्यात वाहून गेला.बरेच ठिकाणी खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाला होता.त्यामुळे या भागातील घोटसुर,वेनासुर,पुनूर, भूमकाम,जवेली, कोताकोंडा, मानेवारा,,गुडराम,गुंडम,सेवारी,मसरामगुडा, परपणगुडा,कोथरी, चोखेवाडा, वांगेझरी आदी गावातील नागरिकांना आठवडी बाजार, रुग्णांवरील उपचार,शेतीसाठी अवजारे,खते,जीवनावश्यक वस्तू,किराणा सामान घ्यायला कसनसूर आल्याशिवाय पर्याय नाही.
या मार्गावर चारचाकी तर सोडा दुचाकीने प्रवास करणे देखील कठीण झाले होते.नागरिकांची अडचण लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनात येथील प्रभारी अधिकारी धिरसिंग वसावे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तब्बल ११ किलोमीटर अंतराचा रस्ता आणि काही ठिकाणचे खड्डे बुजविल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
यासाठी कसनसूर उप पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी, सीआरपीएफ,एसआरपीएफचे अधिकारी,कर्मचारी,कोतवाल प्रवीण मुनरत्ती,मसरामगुडाचे गाव पाटील रसीनाथ गावडे,येशु मट्टामी तसेच परिसरातील तरुणांनी श्रमदान केले.