खुशाल लोडे, सावली तालुका प्रतिनिधी
सावली: सावली तालुक्यातील शिर्षी गावात जंगलात गुरे चारायला गेलेला दिवाकर नथुजी आवळे (वय 45 वर्षे) याला पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. ही दुर्घटना आज दुपारी 1.30 च्या सुमारास घडली.
शिर्षी गाव जंगलाच्या जवळ असल्याने येथे वाघ आणि बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. या प्राण्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. दिवाकर आवळे हे गुरे चारण्यासाठी जंगलाशेजारील शेतशिवारात गेले असता, अचानक आलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ते जागीच ठार झाले.
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी दुसरा गुराखी गावात धावत जाऊन घटनेची माहिती देत असताना बेशुद्ध झाला. गावकऱ्यांनी तत्काळ सावली वनविभागाला या घटनेची माहिती दिली. वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू केले असता दिवाकर आवळे यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर शिर्षी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील जनतेने सावली वनविभागाकडे या हिंसक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे .