अहेरी:- भारतीय संस्कृतीमध्ये सण, समारंभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण, समारंभाच्या माध्यमातून नाती, कुटुंबाविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आपण व्यक्त करतो. श्रावण महिन्यात येणारे सण हीच नाती दृढ करणारे असतात.समाजात चैतन्य येते.आनंदाची आनंदाची देवाण-घेवाण करणाऱ्या या संस्कृतीचे पाईक होऊन महायुती सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांच्या कुटुंब म्हणून विचार केला आहे. त्यामुळेच यंदा राखी पौर्णिमापूर्वीच राज्यातील समस्त भगिनींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत माहेरची ओवाळणी देण्यात आली आहे. बहिण-भावाच्या नात्याचे बंध जपणारा राखी पौर्णिमेचा सण यंदा राज्यातील अनेक महिला भगिनींसाठी आनंद घेऊन आल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
राज्याच्या शेवटच्या टोकावरील व छत्तीसगड सीमेवर असलेल्या दामरंचा येथे एका आयोजित कार्यक्रमात येथील शेकडो महिलांनी मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांना राखी बांधून त्यांना उदंड आयुष्य लाभो, या भागातील खणकर नेतृत्व सुरक्षित राहो,अशी प्रार्थना करून लाडक्या बहिणींनी ओवाळणी केली.यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वर बाबा आत्राम तसेच स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुती सरकारने अशी योजना राबविले आहे. मात्र या योजनेवर विरोधक टीका करत आहेत. पण टीकेशिवाय त्यांच्याकडे दुसरे काम शिल्लक नाही. राज्यातील भगिनींना आनंद देणारी योजना लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त घोषणा केली नाही तर, त्याची अंमलबजावणी देखील करून दाखविली आहे. माझ्या भगिनींच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामुळेच आम्हाला राज्यातील माता-भगिनींचा आशीर्वाद मिळत आहे.
महायुतीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले जात आहे. ते यापुढे देखील सुरू राहणार आहे.रक्षाबंधन निमित्त आपल्याकडून मिळालेला आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोठा असून आपण भारावून गेलो आहे.आपण कोणत्याही परिस्थितीत आपले प्रेम व भावना या विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.