नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 187 व्या बटालियनचे निरीक्षक कुलदीप कुमार यांना वीरमरण आले आहे.
हल्ला उधमपूरच्या दुडू भागात घडला, जिथे दहशतवादविरोधी उपाययोजनांच्या अंतर्गत पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे. दुपारी 3.30 वाजता सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या गस्तीसाठी निघालेल्या तुकड्यावर हल्ला करण्यात आला. निरीक्षक कुलदीप कुमार यांना गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, जेव्हा त्यांना रुग्णालयात नेत होते.
https://x.com/UdhampurPolice/status/1825502868784267319
दरम्यान, उधमपूरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील उंचावरील भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात चार दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले, तर 48 राष्ट्रीय रायफल्सचे जवान कॅप्टन दीपक सिंह यांना वीरमरण आले. दीपक सिंह यांच्या छातीत उजव्या बाजूला तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता वीरमरण आले. याशिवाय जुलैमध्ये डोडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार लष्करी जवान आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी ‘काश्मीर टायगर्स’ या पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या वेगळ्या गटाने घेतली आहे.