इंदापूर (दत्तात्रय गवळी): इंदापूर पोलीस स्टेशन येथे तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांच्या नेतृत्वात पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. या उत्सवात भाऊ-बहिणीच्या नात्याचा महत्त्वपूर्ण दिवस आनंदात पार पडला.
पोलिस बांधव नेहमीच महिलांच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात. महिलांच्या, विशेषतः बहिणींच्या सुरक्षेसाठी त्यांची सेवा अतुलनीय आहे. आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने पोलीस बांधवांना राख्या बांधण्यात आल्या, आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम करत आमच्या बहिणींचे संरक्षण करत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या वेळी तेज पृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात म्हणाल्या की, “राज्यातील सर्व बहिणींचे रक्षण करण्याची जबाबदारी भावावर असते, आणि पोलीस नेहमीच हा भाऊ म्हणून बहिणींचे रक्षण करतात. आम्ही आमच्या पोलीस भावांची खंबीर साथ अपेक्षित करतो.”
तसेच, त्यांनी इंदापूर तालुक्यात सर्व धर्म समभाव आणि शांततेसाठी आवाहन केले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महत्व अधोरेखित करत, त्यांनी याच भावनेने एकत्र राहण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकणे आणि इतर पोलीस बांधव उपस्थित होते. तेज पृथ्वी ग्रुपचे पदाधिकारी आणि कदम गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थिनींचाही या सणाच्या उत्साहात सहभाग होता.