रोहिदास नगर/गोरेगाव (प्रसाद गोरेगांवकर) – स्वदेश फाउंडेशनतर्फे रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील चापडी गावाला ‘स्वप्नातील गांव, आदर्श गांव’ म्हणून घोषित करण्यात आले. या गौरव सोहळ्याचे आयोजन 30 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते गावाचा सन्मान करण्यात आला.
चापडी हे एक छोटे आणि कमी वस्तीचे गाव आहे. परंतु, स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने आणि मदतीने या गावाने आपल्या स्वप्नातील आदर्श गावाची संकल्पना साकारली आहे. चापडी ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी गावात विविध सुधारणा केल्या गेल्या आणि गावाचा विकास साधला गेला. यासाठी गावातील युवकांनी आणि महिला मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
सोहळ्याची सुरुवात रा. जि. प. शाळेच्या शिक्षक मुकेश भोस्तेकर आणि विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली. ग्रामस्थांच्या वतीने ना. अदिती तटकरे यांचे शाल, श्रीफळ, आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी स्वदेश फाउंडेशनच्या वरिष्ठ समन्वयक राजेंद्र बेंद्रे यांचेही सन्मान करण्यात आला.
ना. अदिती तटकरे यांनी स्वदेश फाउंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी स्वदेश फाउंडेशनच्या ग्रामीण सक्षमीकरण आणि आदर्श गांव संकल्पनेला आपले नेहमीच समर्थन राहील असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक गावे आदर्श गावांमध्ये रूपांतरित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमाला स्वदेश फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, माणगांव तहसीलदार दशरथ काळे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सुभाष केकाणे, गट विकास अधिकारी संदीप जठार, गोरेगाव पोलीस निरीक्षक विजय सुर्वे, सरपंच शुभांगी शिर्के, तसेच अनेक ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी आणि महिला मंडळ उपस्थित होते.
चापडी गावाचा गौरव हा केवळ गावातील लोकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. स्वदेश फाउंडेशनच्या मदतीने गावाने आपल्या स्वप्नातील आदर्श गावाची संकल्पना यशस्वीपणे साकारली आहे.