मूल :- बोरचांदली गावात आज( १२ ऑगस्ट) दुपारी वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी गुराखीचे नाव विनोद भाऊजी बोल्लीवार (वय 36) असे असून, ते बोरचांदलीचे रहिवासी आहेत.
विनोद भाऊजी बोल्लीवार हे रोजच्या प्रमाणे आपल्या गाई-म्हशी चारण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर विनोद यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तत्काळ त्यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
विनोद बोल्लीवार यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बोरचांदली गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेतली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात वन विभागाच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला जंगल परिसरात अधिक सतर्कता ठेवण्याची विनंती केली आहे.
वनविभागाने गावकऱ्यांना शांत राहण्याचे आणि जंगलात जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. घटनास्थळी वाघाच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासनाने सुद्धा यावर लक्ष ठेवून आहे.