वरोरा / आशिष घुमे : सध्या सर्वत्र विधानसभेचे वेध लागले आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कामाला लागली आहे . १५ जुलैला मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वरोरा व भद्रावती शहरातील पत्रकार,डॉक्टर,वकील, प्रतिष्ठित व्यक्तीच्या भेटी घेऊन आढावा घेतला .
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका लढवण्यापासून अलिप्त राहिलेली मनसे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार का, हा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांपासून, विविध राजकीय पक्ष आणि जनतेसाठीही उत्सुकतेचा ठरला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मनसे २००ते २५० विधासभा क्षेत्रात उमेदवार देणार असल्याची घोषणा मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती . त्याला आज (१५ जुलै ) दुजोरा मिळाला .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी वरोरा व भद्रावती दोन्ही शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी दरम्यान मनसेला मतदार संघ अनुकूल आहे की नाही याची चाचपणी केली व या भागातील मुख्य समस्या जाणून घेतल्या . नागरगोजे यांनी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या कडे राज्याच्या विकासाचे व्हिजन असून त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शेतकरी सेना शेतकऱ्यांसाठी नेहमी कार्यरत असल्याचे सांगितले . शेती आणि शेतकरी या विषयावर सविस्तर अशी चर्चा झाली.शेतमालाला भाव हे आपल्या हाती नसले तरी उत्पनात वाढ हे आपल्या हातात आहे असे ते म्हणाले . मतदार संघात प्रकल्पग्रस्तांची समस्या मोठी आहे , त्याच सोबत स्थानिकांना रोजगार,प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान,जंगली जनावरांची समस्या,वेकोलिने कृत्रिम तयार केले मातीचे डोंगर यामुळे परिसरातातील नागरिकांना होणारा त्रास व नुकसान इत्यादी समस्या त्यांच्या नजरेस आणून दिल्या .या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच रणनीती आखणार असे ते म्हणाले. हा सर्व आढावा पक्ष प्रमुखांपुढे ठेवणार असून मागील निवडणुकीत पक्षाला मिळालेले मताधिक्य आणि पक्ष व पक्षाचे चिन्न घराघरात पोहचले असल्याने पक्ष ही विधानसभा लढविणार असे मत त्यांनी चर्चे दरम्यान व्यक्त केले .
२०१९ ला मनसे कडून रमेश राजूरकर होते उमेदवार
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा विधानसभा क्षेत्राकरिता उद्योजक रमेश राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती .या निवडणुकीत त्यांना ३४ हजाराच्या वर मताधिक्य मिळाले होते. आता त्यांनी भाजपचा शेला गळ्यात घातला त्यामुळे उमेदवार म्हणून पक्ष पदाधिकाऱ्यांना संधी देणार की नेहमी प्रमाणे उमेदवार आयात करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
२०१४ ला अनिल बुजोने यांना दिली होती संधी
पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असणारे अनिल बुजोने यांना २००९ ला शिवसेनेने तिकीट नाकारले त्यांना डावलून त्यांच्या जागी किशोर डांगे यांना उमेदवारी देण्यात आली होती.त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करून त्यांनी लक्षवेधक मताधिक्य घेतले होते पण त्यांना विजय गाठता आला नाही. मनसे आणि शिवसेनेची विचारधारा मेळ घालत असल्याने २०१४ ला बुजोने यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला . त्यावेळी मनसेचे पदाधिकारी विधानसभा प्रमुख तथा उपजिल्हा प्रमुख प्रवीण सूर हे ही निवडणूक लढण्यास इच्छूक होते पण त्यांना डावलून अनिल बुजोने यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आली आणि पक्षांतर्गत वादाची ठिणगी पेटली. जुन्या पदाधिकाऱ्यांचा पायउतार करून स्वमर्जीतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक बुजोने यांनी केली होती. त्यामुळे अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. या निवडणुकीत बुजोने यांना १० हजार मतांचा आकडा ही गाठता आला नाही पण प्रवीण सूर यांनी मात्र पक्षाला राम राम केला होता.