वरोरा :- ‘स्वरचित रे’ हा स्वलिखित कविता आणि गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम नुकताच वरोरा येथे सादर झाला. आजवर ध्वनिमुद्रित न झालेल्या नव्याकोऱ्या रचनांचा हा कार्यक्रम शनिवार दि. १३ जुलै रोजी संध्याकाळी वरोऱ्यातील कटारिया मंगल कार्यालय येथे रंगला.
रसिकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर व निशिगंधा कमलापूरकर (मुंबई), पराग साठे व मानसी साठे (स्वीडन) आणि पुण्याहून आलेले वादक कलाकार अशा संचाने विविध विषयांवरील कविता व गाणी सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
वरोऱ्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संगीतकार प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अनेक कविता आणि संगीतरचना कार्यक्रमात समाविष्ट होत्या. तसेच मंदार कमलापूरकर, अमोल पाटील आणि इतर नामांकित कवींच्या कवितांचा आणि पराग साठे यांच्या संगीतरचनांचा कार्यक्रमात समावेश होता. पराग साठे आणि निशिगंधा कमलापूरकर यांनी सुमधुर आवाजातील गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली, तर मंदार कमलापूरकर आणि मानसी साठे यांनी निवेदन व कवितांचे अभिवाचन करत श्रोत्यांची दाद मिळवली. सुधीर टेकाळे (हार्मोनियम), अक्षय शेवडे (तबला), आदित्य आपटे (साईड रिदम्स) आणि मंदार देव (सिंथेसायझर) या वादक कलाकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
‘नमो निर्गुणा रे’, ‘तू कशास उजळून जाशी’, ‘मन पिंपळाचं पान’ अशा अनेक कविता, तसेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांवर आधारित ‘भयमुक्त मन असे जेथे’, ‘विपत्तीतही तू मला सावरावे’ अशा रचना सुश्राव्य गायनातून सादर झाल्या. तसेच ‘अक़्स-ए-ख़ुशबू हूं’, ‘मेरे दुख की कोई दवा न करो’ अशा उर्दू गझलही पेश झाल्या. तर ‘पश्चिमेस फुटला मेघ’, ‘पालं उठली बिऱ्हाड हलले’, ‘असे वाटते आज पाऊस व्हावे’, ‘सपनें’, अशा कविता अभिवाचनातून प्रभावीरीत्या या मैफलित सादर झाल्या.
मुळात इतर कवी-संगीतकारांच्या जुन्या प्रसिद्ध रचना न वापरता सादर केलेला संपूर्णपणे नवीन अस्सल रचनांचा हा अभिनव रसिकांची मने जिंकून गेला. शिवाय त्याचे सादरीकरण देखील दर्जेदार झाल्याने त्याला वरोरेकरांची उत्स्फूर्त वाहवा मिळाली.