गडचिरोली : शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. २७ जून रोजी दोन जहाल महिला नक्षलवादी बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, (वय २८) रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, व शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. १०, (वय २९) रा. कटेझरी ता. धानोरा यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. या दोघांवर मिळून १६ लाख रुपयांचे बक्षीस होते.
बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे ही सन २०१० मध्ये गट्टा दलम मध्ये सदस्य पदावर भरती झाली. सन २०१० च्या शेवटी अहेरी दलममध्ये बदली होऊन कार्यरत. सन २०१६ मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन कार्यरत. सन २०२१ मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य) म्हणून बढती व आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकुण २१ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १० चकमक, ०१ जाळपोळ, ०१ अपहरण व ९- इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके ही सन २०११ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली. सन २०१३ मध्ये टिपागड दलममधून कंपनी क्र. ०४ येथे बदली. सन २०२१ मध्ये कंपनी क्र. ०४ मधून कंपनी १० येथे बदली. सन २०२३ मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य) या पदावर बढती व आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत एकुण ०८ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०६ चकमक, ०२ इतर, इ. गुन्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे हिचेवर ०८ लाख रूपयाचे तसेच शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके हिचेवर ०८ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे हिला एकुण ०५ लाख रुपये तर शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके हिला एकुण ०५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण १९ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सदर नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.