गोंडपिपरी (सुरज माडूरवार)
चंद्रपुरातील जिल्हा नियोजन भवनात शेतकऱ्यांच्या समस्या,पिक कर्ज याबाबत नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला गोंडपिपरी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांनी तालुक्यातील समस्यांच्या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला.त्यांनी भंगाराम तळोधी येथील बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकाच्या भोंगळ कारभाराची मालिका मंत्री महोदयापुढे वाचली आणि अवघ्या चोवीस तासांत सबंधित व्यवस्थापकाची तळोधी येथून हकालपट्टी झाली.त्यामुळे खातेदारामध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
अमर बोडलावार यांनी आढावा बैठकीत गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्या.भंगाराम तळोधी येथील बैंक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये २४ फेब्रुवारीपासुन बँक व्यवस्थापक नव्हते.त्यामुळे शेतकऱ्यांचे पिककर्ज,बचत गटाचे आर्थिक व्यवहार,दुकानदारांचे सीसी लोनसह ई-केवायसीचे काम मागील पाच महिन्यांपासून बंद अवस्थेत राहिले.हा प्रकार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिला आणि यावर जलदगतीने तोडगा काढण्यात यावा,अशी मागणी केली.याशिवाय तालुक्यातील अनेक समस्यांचा पाढा मुनगंटीवार यांच्या समोर वाचला.त्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी,अशी विनंती बोडलावार यांनी केली.महत्वाचे म्हणजे त्यांच्या गावातील बँकेत मागील कित्येक महिन्यांपासून व्यवस्थापक नसल्यामुळे तेथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी योजनांचे प्रकरण प्रलंबित राहिले.बँके व्यवस्थापकाअभावी शेतकऱ्यांसह,ठेवीदार,व्यापारी व बचत गटांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.दरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांची देखील शिष्यवृत्तीसाठी फटफजिती सुरू होती.त्यासाठी येत्या सात दिवसाच्या आत नवीन बँक व्यवस्थापकाची भरती करून शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे,सन २०२३-२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे रखडलेले अनुदान,शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून द्यावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.बोडलावारांची जनतेप्रती असलेली तळमळ पालकमंत्र्यांनी जाणुन घेतली आणि समितीसमोर उपस्थित केलेल्या लोकाभिमुख मागण्यांचे लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल,असे आश्वासन दिले.