सोलापूर: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या (Pandharpur Vitthal Mandir) संवर्धनाचं काम सुरु असतानामोठं गूढ उलगडलं. गुरुवारी रात्री 2 वाजता हनुमान गेटजवळ दोन दगडी फरशा खाली पोकळ भाग जाणवल्यावर या कामगारांनी ते दगड हलवून पहिले. त्यावेळी त्याच्या खाली अरुंद तळघर असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर शुक्रवारी दुपारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पुरातत्व विभागाच्या टीमला पाचारण केले.
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान या तळघरावरील दगड काढून आत कर्मचारी उतरले असता समोरच्या बाजूला जवळपास 8 फूट लांब आणि 6 फूट उंच अशी खोली दिसून आली. यानंतर सुरक्षेचे नियम पळत येथे कर्मचारी उतरवून त्यांनी येथे तपासणी केली असता यात भुयारी खोलीत काही जुन्या मुर्ती असल्याचे समोर आले.
गुप्त खोलीत काय काय सापडलं?
सुरुवातीला काही लहान मूर्ती, काही जुनी नाणी बाहेर काढण्यात आली. यामध्ये एक भग्न पादुका, एक भग्न लहान स्त्रीची मूर्ती आणि एक लहान देवीची मूर्ती बाहेर काढण्यात आली. यानंतर साडेतीन फूट उंच अशी व्यंकटेशाची मूर्ती बाहेर काढली. ही मूर्ती अनेक वर्षे मातीत राहिल्याने खराब झालेली असून याच्या हातावर पद्म , चक्र असल्याचे दिसून आले .
दुसरी तेवढ्याच आकाराची विष्णूच्या दुसऱ्या रूपातील मूर्ती बाहेर काढली. या मूर्तीच्या शेजारी दोन अप्सरा असून मूर्तीमध्ये चार हात असलेल्या विष्णूच्या हातात शंख, पद्म व इतर आयुधे आहेत. पहिली व्यंकटेशाची मूर्ती थोडी भग्न पावलेली असली तरी दुसरी मूर्ती मात्र त्या तुलनेने चांगल्या अवस्थेत होती. यानंतर अडीच फुटाची महिषासूर मर्दिनी रूपातील मूर्ती बाहेर काढण्यात आली.
सर्व मूर्ती 15 ते 16 व्या शतकातील
या सर्व मूर्ती या 15 ते 16 व्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी माझाशी बोलताना सांगितले . या मूर्तीवर असणाऱ्या खुणा या फार पुरातन नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून आता पुरातत्व विभागाचे मूर्ती तज्ज्ञ या मूर्तींचे डेटिंग करून नेमके साल शोधून काढतील असे सांगितले. अजूनही या तळघरातील माती बाहेर काढायचे काम सुरु असून अजून काही निघते आहे का याची तपासणी केली जात असल्याचे वहाणे यांनी सांगितले.
एकंदर या गुप्त खोलीबाबत असलेले गूढ पूर्णपणे उकळले असून आता पुरातत्व विभाग याचा अभ्यास करून पुढील दिशा ठरविणार आहे. या मूर्ती संरक्षणासाठी अशा ठिकाणी लपवून ठेवण्याची शक्यताही पुरातत्व विभागाच्या वहाणे यांनी सांगितली.