गडचिरोली: भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा नदीपात्रातून चक्क मुरूमचा रस्ता बनवून शेकडो ब्रॉस रेती उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांनी धाड टाकून हा सगळा प्रकार उघडकीस आणत योग्य चौकशी करण्याचे निर्देश देताच भामरागड तालुका मुख्यालयात एकच खळबळ उडाली. मागील अनेक दिवसापासून वनविभागाच्या हद्दीत तस्करांनी शेकडो ब्रॉस रेती साठवून ठेवली.मात्र, वनविभागाला याची माहितीच नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे ताडगाव वनपरिक्षेत्रात नेमकं चाललय तरी काय ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
३१ मे रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने भामरागड तालुका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापनची सभा घेण्यासाठी गेले असता त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी महसूल विभाग आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पर्लकोटा नदी काठावरील जंगलात अवैध रेती साठ्यावर धाड टाकली. उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांनी स्वतः चक्क जंगलात प्रवेश करून रेती साठ्यावर धाड टाकल्याने रेती तस्करांमध्ये धडकी भरली.सध्या तालुक्यात या कारवाईची एकच चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अवैध रेती साठवून ठेवली होती, ती जागा ताडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या हेमलकसा उपक्षेत्रातील बेज्जूर नियातक्षेत्रातील आहे. महसूल आणि वनविभागाने केलेल्या पंचनामानुसार तब्बल ११६ ब्रास रेती या ठिकाणी आढळून आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती या जंगल परिसरात साठवून ठेवली असताना वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काय करत होते ? ताडगाव वन परिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी नेमकं मुख्यालयात राहतात काय ? असे असेल तर आपल्याला ठरवून दिलेल्या क्षेत्रात काय चाललं याची माहिती का नाही ? याची सविस्तर माहिती असताना देखील कारवाई करण्यात आली नाही काय ? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
भामरागड तालुक्यातील बारमाही वाहणाऱ्या नद्यांमध्ये उत्तम प्रकारची रेती आहे.याठिकाणी रेतिघाट साठी अनेकदा प्रयत्न झाले.मात्र पर्यावरण आणि वन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने तालुका मुख्यालयात रेतिघाट मिळू शकले नाही अशी चर्चा आहे.परिणामी मागील दोन वर्षांपूर्वी येचली येथे एकच रेतीघाट मंजूर करण्यात आले होते. मात्र हा रेतीघाट सुद्धा वादग्रस्त ठरला. येथील रेती घाटातून एकही कण रेती उचलले नसून अवैध रेती उत्खनन सुरू असल्याचे जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्ययक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी उघडकीस आणून उच्च न्यायालयात केस दाखल केली.
वन विभाग रेती घाटसाठी ना हरकत प्रमाणपत्र देत नाही मात्र, अवैध रेती साठवणूक करण्यासाठी तस्करांना मुखसंमती तर दिली नाही ना ? असा प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित केले जात आहे.भामरागड वन विभागातील ताडगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत शेकडो ब्रास अवैध रेती आढळून आली.तर भामरागड वनपरिक्षेत्राच्या हद्दीत देखील असा प्रकार नाही ना ? अशी खमंग चर्चा परिसरात सुरू आहे.