गडचिरोली:- जिल्ह्यातील दक्षिण भागातील आलापल्ली ते सिरोंचा ३५३-सी या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पुलाजवळील जंगल परिसरात २४ मे रोजी सायंकाळच्या सुमारास झाडाला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.वासुदेव बिनोद सरकार (वय अंदाजे ४८) असे त्याचे नाव असून मुलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील रहिवासी आहे.
सिरोंचा रस्त्यावर पुलाजवळील जंगल परिसरात सायंकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह गळफास घेतल्याल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली.लोकांनी या राष्ट्रीय महामार्गावर एकच गर्दी केली.याची माहिती मिळताच आलापल्लीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले.मोका पंचनामा करून मृतदेह अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनसाठी पाठविले.
घटनास्थळी मृतदेह जवळ कपडे भरलेली बॅग होती.चप्पल देखील घटनास्थळी आढळून आले.मृतकाच्या खिशात एका पॉलिथिन मध्ये काही कागद आणि डायरी आढळल्याने पोलिसांनी ती तपासून पाहताच सदर इसम मुलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील वासुदेव बिनोद सरकार असल्याचे निष्पन्न झाले.सदर इसम यापूर्वी बाहेर एका खाजगी कंपनीत काम करायचा.मात्र,तो तिथून परत आला आणि मागील काही दिवसापासून अहेरी परीसरात काम करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.त्याच्या पश्चात पत्नी आणि २२ वर्षीय मुलगा आहे. या घटनेचा पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.