गोंडपिपरी :-
बल्लारपूर-गोंडपिपरी महामार्गावर अतीवेगाने धावणाऱ्या जडवाहतूकीमुळे नेहमीच अपघातांची मालिका सुरू असते. आज (०९)दुपारच्या सुमारास धानापुर-गणपुर रस्त्यावर अपघात झाल्याने रविंद्र झाडे (रा. गोंडपिपरी) हा बराचवेळ बेशुद्धावस्थेत पडून होता. परंतू जखमी रविंद्रला तातडीने रूग्णालयीन उपचार मिळावा, यासाठी भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे देवदूतासारखे धाऊन गेले.
देवराव भोंगळे हे गोंडपिपरी तालुक्यातील आपले नियोजित कार्यक्रम आटोपून राजुऱ्याकडे मार्गस्थ असतांना त्यांना धानापुर-गणपुर रस्त्यावर अपघात होऊन एक व्यक्ती रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. गाडी थांबवून बघितल्यावर तो व्यक्ती बऱ्याच वेळापासून मदतीच्या अपेक्षेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्क्षणी कोणताही विलंब न करता देवराव भोंगळे यांनी जखमीला स्वतःच्या गाडीत टाकून उपजिल्हा रुग्णालय बल्लारपूर येथे उपचारार्थ दाखल केले. लागलीच डॉक्टरांनी तपासणी करून जखमीच्या डोक्याला मार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
देवराव भोंगळे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि जखमी रविंद्रवर आता उपचार सुरू झाला आहे.
‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार देवराव भोंगळे जखमी रविंद्र झाडे साठी देवदूतासारखे धावून गेले. म्हणून परीसरातील नागरिक आणि जखमीच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.