गडचिरोली:- जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या दोन मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 9 मे रोजी उघडकीस आली.अवघ्या चार दिवसांच्या अंतराने दोन मातांचा मृत्यू झाल्याने दुर्गम व मागास जिल्ह्यात आरोग्य सेवेचा कसा बोजवारा उडालेला आहे हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
सरिता संतोष तोटावार (वय २४ रा.चिंचगुंडी ता.अहेरी) व नागुबाई जितेंद्र कोडापे (वय २३ रा.वडलापेठ ता-अहेरी) अशी मृत मातांचे नावे आहेत. दोघांचीही नवजात बालके सुखरूप आहेत सरिता ही प्रसववेदना जाणवू लागल्याने ३ मे रोजी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर ४ मे रोजी ती कुटुंबासोबत घरी गेली व घरीच तिची प्रसूती झाली. मात्र प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने तिला नातेवाईकांनी ५ मे रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले पण तिने वाटेतच प्राण सोडले. नागुबाई खोडापे ही २३ एप्रिल ला रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच दिवशी प्रसूती झाली २५ एप्रिल रोजी सुट्टी दिली. मात्र १३ दिवसांनी अचानक नागुबाईची प्रकृती खालावली. ती पुन्हा भरती झाली. फिजिशियन व सर्जन उपलब्ध नसल्याने तिला दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सरिता तोटावार व नागुबाई कोडापे या दोघींची ही दुसरी प्रसूती होती. दोघींनीही मुलाला जन्म दिला होता चार दिवसांच्या अंतराने दोघींचाही मृत्यू झाला त्यामुळे निरागस चिमुकले मातृ प्रेमाला पारखे झाले आहेत.
अहेरी उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत जिल्ह्याच्या दक्षिण भागातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी हे पाच तालुके समाविष्ट आहेत. या पाचही तालुक्यात मोठे रुग्णालय नसल्याने बरेच रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी अहेरी येथे दाखल होतात. या भागात धड रस्ते नसल्याने रुग्णाला कधी झोळी करून, तर कधी नदी-नाले पार करून दवाखान्यात नेताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत असते. अशा स्थितीत मोठ्या आशेने उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची देखील गैरसोय होत असल्याने आता आरोग्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात सर्जन फिजिशियन सारखी महत्त्वाचे अनेक महत्वाची पदे रिक्त असल्याने दुर्गम व आदिवासीबहुल भागातील आरोग्य सेवेचे विधारक वास्तव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
बॉक्स—-
दोन्ही प्रकरणात उपचारासाठी फिजिशियन गरजेचे होते. या रुग्णालयात फिजिशियन उपलब्ध नव्हते. हे पद रिक्त असल्याने त्या दोघींनाही रेफर केल्याखेरीज पर्याय नव्हता. रिक्त पदे भरावी त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-डॉ कन्ना मडावी,अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय,अहेरी