मीरा कॉलनी येथील स्वच्छता मोहीम ठरली प्रेरणादायक
पुलगाव -परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे येऊन मीरा कॉलनी कॉलनी परिसरातील तब्बल पन्नास नागरिकांनी एकत्र येऊन कॉलनीतील मंदिर परिसराची साफसफाई केली.
सुरुवातीला चार-पाच जणांनी मांडलेली संकल्पना साखळी शृंखला जोडल्यासारखे मोठ्या प्रमाणात नागरिक यामध्ये सहभागी झाले. सकाळी सात पासून ते नऊ वाजेपर्यंत खराटे, पावडे, टोपले घेऊन नागरिकांनी पुर्ण परिसर स्वच्छ केला तसेच स्वच्छ केलेला कचरा जाळला. शासकीय संस्था तसेच इतर योजना यांच्या मागे न लागता आपला परिसर सामूहिकरीत्या आपणच स्वच्छ केला तर तो योग्यरीत्या स्वच्छ होतो तसेच परिसरातील नागरिक एकत्र आल्याने सामाजिक बांधिलकी जोपासली जाते व विचाराची देवाणघेवाण होते. स्वच्छ परिसरामुळे रोगराई पसरण्यास मज्जाव होतो व मनही प्रसन्न राहते. प्रत्येक महिन्याच्या एक ते दोन रविवारी हा उपक्रम राबवायचा, असा मानस मीरा कॉलनी वासियांनी केला.ज्या स्वच्छतेला दोन हात लागली, त्या स्वच्छतेला हातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तर काय परिणाम दिसतो याचे उत्तम उदाहरण हे
मीरा कॉलनीतील मंदिर परिसर ठरले.
बॉक्स
*९०वर्षाच्या वृद्धाचा सहभाग ठरले आकर्षण*
स्वच्छतेच्या उपक्रमाविषयी फारसा रस नागरिकात दिसत नाही. त्यासाठी सुरुवातीला थोडे व नंतर जास्त प्रमाणात लोक एकत्र येऊन तो उपक्रम पूर्ण करतात. अशा परिस्थितीत मीरा कॉलनीतील ९० वर्षीय गृहस्थ वसंतराव वंडलकर यांनी स्वच्छता उपक्रमात घेतलेला सहभाग व त्यांची उपस्थिती ही उपस्थितांसाठी प्रेरणा ठरली. वृद्ध जर हजर राहू शकतात तर आपण का नाही? हा विचारही मार्गदर्शक ठरेल.