मूल प्रतिनिधी
२३ नोव्हेंबरला घेईल भरारी
बल्लारपूर विधानसभा निवडणुकीचा रण तापला असून, आता मतदानानंतर समाजमाध्यमातून सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते आपलाच नेता विजयी होणार असल्याचे सांगत आहेत. राजकीय वारे आपल्या नेत्याशी सुसंगत आहेत. जास्तीत जास्त मतदार आपल्याच उमेदवाराला निवडून देणार आहे. तसेच ‘आमचा नेता लयभारी, २३ नोव्हेंबरला घेईल उंच भरारी’ अशा पोस्ट उमेदवारांचे समर्थक समाज माध्यमावर व्हायरल करत असल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारांच्या विजयाचे संकेत देण्यासाठी विविध प्रकारचे फोटो. पोस्ट आणि पार्श्वसंगीत देऊन आपलाच उमेदवार विजयी कसा होईल हे पटवून देताना कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ होऊ लागली आहे. ज्या उमेदवाराचे पारडे हलके आहे, त्यांचे कार्यकर्तेदेखील हवा कुणाचीही असली तरी उमेदवार मात्र आमचाच निवडून येईल, असे सांगत आपल्या उमेदवाराविषयी दबदबा निर्माण करत आहेत. अनेक प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांकडून संबंधित उमेदवाराच्या उखळ्यापाखळ्या काढण्याचे सत्र सध्या सुरू आहे. यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. तसेच काही नेटकरी ट्विटर यांसारख्या समाज माध्यमांवरदेखील व्यक्त होत आहेत.
प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यामुळे पोस्ट वाचल्यावर प्रतिसाद दिला जात आहे. यामुळे अधिकाधिक जनतेच्या मनात काय आहे, हे कळत आहे. अनेक वेळा विवादित पोस्ट देखील व्हायरल केल्या जातात. यामुळे दोन गटांत हाणामाऱ्या किंवा विवादाचे प्रकार घडतात. परंतु हे घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहे.
विधानसभेवर साऱ्यांचेच लक्ष बल्लारपूर विधानसभा क्षेत्र मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील हेवीवेट मंत्री म्हणून ओळख असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूरमधून चौथ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. मागील पंधरा वर्षांपासून त्यांनी विधानसभा क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात कायापालट केला आहे. थेट मतदारांपर्यंत संपर्क असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा यावेळचा चौकार रोखण्यासाठी
काँग्रेसने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना निवडणूक मैदानात उतरविले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांचा चौकार काँग्रेसचे रावत रोखतील का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, या क्षेत्रात डॉ. अभिलाषा गावतुरे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मुनगंटीवार आणि रावत यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.मागील काही वर्षांपासून वाढविलेला जनसंपर्क, सामाजिक,आरोग्य क्षेत्रात काम, आरोग्य विषयकजनजागृती, सर्वसमाज बांधवांसोबत असलेला सलोखा, आंदोलन, मोर्चा काढून सतत प्रकाशझोतात, समाजकार्यात असलेली जिद्द, तळमळ.
महायुती, महाविकास आघाडी ,अपक्ष यांच्यात झालेल्या लढतीत आमदार नेमका कोण होणार? यावर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील मंडळी समाज माध्यमातून आपापले मत व्यक्त करीत आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत जनमत कोणाच्या दिशेने आहे, हे येत्या दि. २३ नोव्हेंबरलाच निश्चित होईल.