गडचिरोली: राज्याच्या शेवटच्या टोकावरील माओवादग्रस्त गडचिरोलीतील पोस्टिंग म्हटले की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कपाळावर आट्या पडतात पण बीडच्या एका तरुण अधिकाऱ्याने आदिवासींची सेवा करण्यासाठी थेट प्रधान सचिवांना पत्र लिहून गडचिरोली पोस्टिंग द्या, अशी विनंती केली या अधिकाऱ्यांची विनंती प्रधान सचिवांनीही मान्य केली अहेरी येथे त्यांची गटविकास अधिकारी म्हणून १३ मार्च रोजी नियुक्ती झाली. अभिजीत गहिनीनाथ पाखरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
अभिजीत पाखरे हे मूळचे पाडळी (तालुका शिरूर कासार) येथील. आई वडील शिक्षक आहेत.खाजगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत.चौथीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अभिजीत यांनी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडच्या चंपावती विद्यालयात घेतले. त्यानंतर त्यांनी पुणे गाठले. फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्रातून बी.ए.ची पदवी संपादन केल्यावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.
२०१९ मध्ये त्यांनी परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी निवड झाली. नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यावर त्यांनी आदिवासीबहुल व माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सेवा करण्यासाठी चक्क प्रधान सचिवांनाच पत्र लिहून संधी देण्याची विनंती केली आहे.विशेष म्हणजे त्यांनी विनंती पत्रात अहेरी,कोरची आणि मुलचेरा या तीन तालुक्यात कुठेही सेवा करण्याची तयारी दर्शवली आहे.अखेर त्यांची १३ मार्च रोजी अहेरी येथे नियुक्ती झाली.
बीड सारख्या जिल्ह्यातील या तरुण अधिकाऱ्यांनी चक्क आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पोस्टिंग मागितल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.सध्या त्यांचा विनंती अर्ज समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.अहेरी येथे मागील अनेक दिवसांपासून गटविकास अधिकाऱ्याचे पद रिक्त असून येथील बालविकास अधिकारी राहुल वरठे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आले आहे.अभिजित पाखरे यांची नियुक्ती झाल्याने परिसरात देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या भागातील गोरगरीब जनतेचे रखडलेले कामे पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.